स्टीवन स्पीलबर्ग दिग्दर्शित ' सेव्हींग प्रायव्हेट रायन 'हा चित्रपट पाहिला. ख्रिश्चन दफनभूमी मध्ये एक वृद्ध हलक्या पावलांनी चालत आहे. त्याच्या डोळ्यातील प्रचंड कृतज्ञता आणि त्याचे कुटुंब या सीनपासून सुरू झालेला चिञपट आपल्याला थेट दुसर्या महायुद्धात घेऊन जातो.बॉम्बचा वर्षाव, सैनिकांच्या मस्तकाचा-छातीचा वेध घेणारा गोळीबार त्यातूनही काही जखमी जगू शकणारे सैनिक यांना वाचवत पुढे पुढेच जाणारे सैनिक आणि शेकडो जवानांच्या प्राणाच्या बदल्यात शेवटी बीचवरील तळावर मिळवलेला कब्जा.
या आणि इतर ठिकाणच्या युद्धात Ryan या एकाच कुटुंबातील चार भावंडांचा समावेश आहे. यातील तीन भाऊ मारले जातात.एका मिशनवर असलेला आणि सर्वात लहान असलेला जेम्स रायन हा जिवंत आहे कि नाही हे माहीतही नाही तरी वरिष्ठ पातळीवर निर्णय होतो की जेम्सला शोधायचे आणि जिवंत घरी आणायचे.त्याला घेऊन येण्यासाठी कॅप्टन मिलरच्या नेतृत्वाखाली आठ जणांची एक तुकडी मिशनवर आहे. जेम्स रायनला शोधेपर्यंत त्यातील दोघेजण मारले जातात.रायन ज्या ठिकाणी असतो तेथे काही वेळेतच शञू सैन्याचा हल्ला होणार असल्याने आपल्या सहकाऱ्यांना आपली गरज असल्याचे कारण देवून तो कॅ. मिलरबरोबर जाण्यास नकार देतो. ते पाहून कॅ. मिलरही त्याच्या सहकाऱ्यांसह तेथेच थांबतो. याठिकाणी शञू बरोबर झालेल्या चकमकीत इतर बरेच सैनिक मरतात कॅ.मिलरही शेवटच्या श्वासापर्यंत लढतो पण शेवटी रायनला आणि त्या तळाला ते सर्व वाचवतात. मरताना कॅ.मिलर रायनला म्हणतो कि " तू या जिवनाचा हक्कदार आहेस " आणि चिञपट पुन्हा जिथून सुरू झाला त्याच वृद्धाजवळ येतो. तो वृद्ध म्हणजेच जेम्स रायन. तो खूप रडतो आणि आपल्या पत्नीला विचारतो कि खरंच मी या जीवनाचा हक्कदार होतो का ? मी माझे जीवन चांगले जगलो का? मी एक चांगला माणूस आहे का ? आणि त्याची पत्नी उत्तर देते - नक्कीच तू एक चांगला माणूस आहेस.
दुसर्या महायुद्धानंतर जगावर आलेलं सर्वात मोठे संकट म्हणजे Covid-19. डॉक्टर, नर्स, पोलीस, सफाई कामगार आणि या व्हायरसच्या विरोधात काम करणारे प्रत्येक व्यक्ती-संस्था हे देखील आपल्या जिवाची पर्वा न करता सर्व मानवजातीला वाचविण्यासाठी अहोरात्र काम करत आहेत.ठिकठिकाणी धोका दिसत असताना देखील ते काम करत आहेत. कूठुन कधी कसा कोरोना व्हायरसचा हल्ला होईल हे सांगता येत नाही तरी देखील ते आपले कर्तव्य पार पाडत आहेत. ते त्यांच्या कामात नक्की यशस्वी होतीलच....
आपणही काही वर्षांनी म्हातारे होऊ जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात असू आणि आपणही आपल्या पत्नीला/पतीला विचारत असू कि मी या जीवनाचा हक्कदार होतो का ? मी माझे जीवन चांगले जगलो का ? मी चांगला माणूस आहे का ? आणि आपल्याही पत्नीचे/पतीचे उत्तर होकारार्थीच असेल याची जबाबदारी घेऊया.