माझे ते दोन तास

काहीही कारणे न सांगता करमाळ्यात तू मला भेटायला यायचेय यावेळी नाही म्हणणार नसशील तरच मी पुढे बोलेन या आशयाचा उमेशचा मेसेज सकाळी सकाळी माझ्या  व्हॉट्सअप वर आला.मी म्हटले अरे सांग तरी काय काम आहे....तो म्हणाला खूप दिवस झाले आपण भेटलो नाही मला तुला बघायचेय. खरं तर मला त्या दिवशी येता येणार नव्हते मला माझी काही आवश्यक कामे होती पण का कुणास ठाउक मी त्यावेळेस नाही म्हणू शकलो नाही.एरव्ही नाही म्हणण्यास जराही न कचरणारा मी कुठल्यातरी अनामिक ओढीने मी माझ्या कामांविषयी कुठलाही विचार न करता त्याला नाही न म्हणता हो म्हणालो आणि कुठे भेटायचेय असे विचारले.त्याने मला 11.00-11.30 वाजता फोन करतो करमाळ्यात ये म्हणून सांगितले.
नंतर त्याचा फोन आला मला आता थोड्या वेळाने काम आहे लवकर ये आणि मी करमाळ्याला निघालो.मी त्याला पोथरे नाक्यावर यायला सांगितले तर तो आला नाही.मी पेट्रोल टाकून राजयोग हॉटेलवर येतोय तू तिथे ये असे त्याने मला सांगितले.मला नेमकं काय घडतंय याचा अंदाज येत नव्हता.मी त्याला एकटा आहेस का विचारले तर त्याने एकटा असल्याचे सांगितले मग मी पण माझ्याबरोबर कुणाला न घेता निघालो कारण तो आणि मी यांच्यामध्ये इतर कोणी नसावे आणि आम्हाला एकमेकांना वेळ देता यावा असे मला वाटत होते.

मी राजयोग हॉटेलवर गेलो तर तो एकटाच बसलेला मला दिसला.मी तो बसला त्या ठिकाणी गेलो.त्याने मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या गळाभेट झाली आणि आम्ही बसलो.त्याने मला विचारले तुला काम तर नाही ना...मी म्हणालो मला तर आता काही काम नाही तुलाच काहीतरी काम आहे तुलाच उशीर होईल.तर तो म्हणाला हं मला काम आहे चल...आणि आम्ही तिथून उठलो.
 तो मला हाताला धरून पुढे चालू लागला.आम्ही स्पेशल रूमकडे जाऊ लागलो.मी त्याला म्हणालो अरे तुझे काम इकडे आहे की दुसरीकडे...तो माझ्या हातावरची पकड अधिक घट्ट करीत म्हणाला तुला मी दारू प्यायला घेऊन चाललोय असं वाटतय काय ? मी थोडसं गोंधळून गेलो खरंच काय होतय ते मला समजत नव्हतं. मी थोडी हुशारी मनात आणून म्हणालो अरे तू तस करणारच नाहीस तर मला तस वाटण्याचा प्रश्न येतोच कुठून ? तो मला एका जाळीदार असणाऱ्या स्पेशल रूमकडे घेऊन जाऊ लागला.रूम जाळीदार असल्याने आतमध्ये कोण आहे हे ओळखू येत नसले तरी आतमध्ये कोणीतरी आहे हे बाहेरून कळत होतं.मी त्याला म्हणालो अरे आतमध्ये कुणीतरी बसलेले आहेत आपण दुसरीकडे बसू. तर तो म्हणाला आपल्याला तिथंच जायचय.मी म्हणालो आतमध्ये कुणीतरी बसलेय तुला दिसत नाही का आणि मी थोडंस हळू चालायला लागलो.हो मला दिसतंय असं म्हणत त्याने माझ्या हातावरची पकड अधिकच घट्ट केली आणि पुढे ओढले आता आम्ही दरवाजाजवळ होतो.मला काही कळायच्या आत त्याने दरवाजा बाजूला करून मला आत ढकलले.
त्याच्या मनात काय आहे याचा मला खरंच काहीच अंदाज येत नव्हता.मी त्याविषयी विचार करत असतानाच आतमध्ये जबरदस्तीने आला गेलो होतो आणि समोर पाहतोय तर काय माझे मिञ आतमध्ये माझ्या वाढदिवसानिमित्त मला शुभेच्छा देण्यासाठी माझी वाट बघत बसलेले होते.ते सर्वजण मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत होते.त्यांच्या शुभेच्छांनी मी भारावून गेलो होतो.माझ्या छातीतील धडधड वाढली होती आणि श्वासोच्छवासाची क्रीया वेगवान झाली होती.भारावून जाणे हा वाक्प्रचार मी प्रत्यक्षात अनुभवत होतो.क्षणभर मी स्तब्ध झालो होतो.माझ्या समोरच माझे नाव असलेला केक मला दिसत होता.माझ्या मनात असलेल्या प्रश्नाचं उत्तर मला आतमध्ये गेल्यावर कुठलेही प्रश्नचिन्ह न राहता मिळालं होतं.आतमध्ये किशोर बागल,हनुमंत भांडवलकर,प्रितम माळी,केतन संचेती,कृष्णा बागल हे माझे दहावीचे मिञ बसले होते.त्यांना मी बऱ्याच दिवसांतून एकञितरीत्या भेटत होतो.

उमेशने जयकुमार बागल,राहुल जाधव आणि दिनेश पुंडे यांनादेखील बोलाविले होते पण काही कारणांमुळे ते येऊ शकले नव्हते.आम्ही त्यांना खूप मिस करत होतो.मी खुर्चीवर बसणार एव्हड्यात कोणीतरी म्हणाले अरे याला हाण्यासारखा(हनुमंतसारखा)मारायचा का रे...तेव्हड्यात आणखी कोणीतरी म्हणाले अरे याला नको-याला नको.मी मार खाण्यासाठी मनाची तयारी केली होती पण तशी वेळ आली नाही.

माझे नाव असलेला केक माझ्या समोर ठेवला होता.मी केक कापून मिञांमध्ये अशापद्धतीने वाढदिवस प्रथमच साजरा करत होतो.मला खरंच खूप मज्जा वाटत होती.आपण कोणीतरी स्पेशल असलेल्या भावनेची जाणीव माझ्या ह्रदयाला स्पर्शून जात होती.खूप दिवसांनी भेटलेल्या मिञांमध्ये मी होतो आणि मी केक कापला.माझ्या थोंडाला केक लावायला उमेश बिलकुल विसरला नाही.वेटरला हनुमंतच्या झोलो मोबाईलमध्ये फोटो काढायला लावले.मध्येच कुणीतरी म्हणाले आपण धनश्रीवर जावुया.पण आम्ही दहावीनंतर बऱ्याच दिवसांनी सर्वजण याच राजयोग हॉटेलवर भेटलो होतो म्हणून तिथेच थांबयचे ठरले.उमेशने स्प्राईट आणि जेवणाची आर्डर दिली.स्प्राईट पित पित जेवण येईपर्यंत आम्ही गप्पा मारत बसलो.आता मी रिलँक्स झालो होतो.सर्वजण एकमेकांना चिडवत होते विशेषत: किशोर हनुमंतची खूपच घेत होता.एकंदरित आम्ही सर्वजण खूप खूश होतो.आम्ही जेवण केले.आपण आणखी सारखं भेटत जाऊ असं प्रत्येकजण म्हणत होता.प्रत्येकाला स्वत:चे काहीना काही काम होते तरी देखील प्रत्येकजण वेळ काढून आला होता.आपल्या मिञांना एकञितरीत्या भेटतानाचा आनंद माझ्यासह सर्वांच्याच चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.एकञितपणे पुन्हा भेटण्याची आश्वासने देऊन आम्ही एकमेकांचा निरोप घेतला.माझ्या या दोन तासांत मी जीवनाचा खूप आनंद घेतला.
माझा वाढदिवस उमेश आणि माझे मिञ यांनी मिळून खूप आनंदात साजरा केला त्याबद्दल मी त्यांना बिलकूल धन्यवाद देणार नाही तसे ते मैञीमध्ये कधीच शोभणार देखील नाही.पण सर्वांनी असेच कशाचेतरी निमित्त करून एकञ यावे अशी अपेक्षा माञ ठेवतो.
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 🌹नटराज शिंदे🌹

Leave a Reply

Your email address will not be published.